Sunday, September 9, 2012

हेल्मेटसक्ती : त्या प्लॅस्टीकच्या डोक्याचा किती बाऊ करणार ?


दोन दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्रात पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती विषयीचा लेख वाचला आणि मनात काही प्रश्नं निर्माण झाले आहेत.  पुण्यात, महाराष्ट्रात किंवा देशभरात जे काही अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, ते हेल्मेट न घातल्यामुळे आहे का ? हेल्मेट वापरल्याने वाहतुकीच्या समस्या सुटणार आहेत का ?
हेल्मेटसक्ती करायलाच हवी का ? हेल्मेटच्या सक्तीची मागणी करणारे लोक समाजातल्या सगळ्या घटकांचा विचार करतात का ? करत असतील तर मला त्यांना काही प्रश्नं विचारायचे आहेत. ते पुढीलप्रमाणे :बरचसे पालक आपल्या मुलांना कौतुकाने '१० वी झाली' कि गाडी घेऊन देतात. तेव्हा ती मुलं १५-१६ वर्षाची असतात. कॉलेजला जायला गाडी हवी म्हणून विना-परवाना दुचाकी चालवणं किंवा चालवू देणं, कितपत योग्य आहे ? १८ वर्षांखालील मुलांना वाहन-परवाना नसताना दुचाकी वापरायला द्यायची आणि नंतर अपघाताचं प्रमाण वाढल्याची चर्चा करत बसायचं, हे योग्य आहे का ? वाहन चालवण्याचा परवाना असणं किंवा नसणं याला आपण किती महत्त्व देतो ?  प्रत्यक्ष RTO  कार्यालयात जाऊन तिथे स्वतः वाहन चालवून तो इंग्रजी ८ आकडा काढून दाखवून किती लोकांनी परवाना मिळवलाय ? 

मुळात ८ आकडा काढून दाखवायचा म्हणजे नक्की काय , हेच बर्‍याचशा लोकांना माहीती नसतं. वाहन परवाना मिळवताना कित्येक लोक फक्त दलालाला पैसे देतात आणि परवाना मिळायची वाट बघत घरात बसून रहातात, ८-१५ दिवसांत घरपोच वाहन परवाना मिळतो.  हे असले गैरप्रकार थांबवून  अपघाताचं प्रमाण कमी करावं  असं वाटत नाही का पोलीसांना ?  का फक्त हेल्मेट  घातल्यानेच  अपघात कमी होणार आहेत ?

पुण्याच्या वाहतूकीला शिस्त नाही हि जगजाहिर गोष्ट आहे. सिग्नल सुटायच्या आधीच पुढे पळणारे लोक, हॉर्न वाजवून कुठलीहि पूर्वसूचना न देता कुठल्याही गल्ली-बोळांतून कसेही गाड्या घेऊन बाहेर पडणारे लोक, रस्ता ओलांडताना लाल सिग्नलची वाट न पहाता थेट रस्त्यावर येऊन आडवा हात करून वाहन-चालकांना थांबण्याची खूण करणारे लोक, पादचारी मार्गावरून आणि सायकलच्या मार्गावरून दुचाकी आणि कधी कधी मोटारी घेऊन जाणारे लोक, व्यवस्थित स्टॉप यायची वाट न बघता सिग्नललाच रिक्षामध्ये- बसमध्ये चढ-उतार करणारे लोक, हि सगळी अपघाताची मुख्य कारणे आहेत. आणि कळत-नकळतपणे तुम्ही, मी, आपण सगळेच यापैकी एक ना एक प्रकार रोज करत असतो. तर मग या प्रकाराला शिस्त कशी लावता येईल याचा विचार करायला नकोय का ? का केवळ हेल्मेट घातल्याने हे सगळे प्रश्नं सुटणार आहेत ?

पुण्यातल्या स्कूटी-धारक मुली : रस्त्यावरून आपण चालत असताना अचानक जवळून जोरात काहीतरी गेल्यासारखं वाटतं आणि हवेत सुगंध दरवळत रहातो. परफ्युम आणि अत्तराने अंघोळ करून सुसाट वेगाने मुलांची बरोबरी करत 'कट्' मारुन जाणार्‍या मुली पाहिल्यात आहेत का तुम्ही, घरात डोकावून पहा स्वतःच्या, सापडतील कदाचित.  ड्रायव्हिंग शिकताना त्यांना फक्त 'गाडिचा कान पिळायला' शिकवलेलं असतं का ? दुचाकीला ब्रेक असतो हे अजिबात माहिती नसतं का त्यांना ?

कशाचीही पर्वा न करता सुसाट वेगाने दुचाकी चालवणारी मुलं,  मुद्दाम 'कट्' मारून जाणारी मुलं,   जोरात आणि उग्र प्रकारचं ड्रायव्हिंग करणारी मुलं,  चित्रपटात बघून स्टंट करणारी, हिरोगिरी करणारी मुलं, भर रस्त्यात- गर्दीत 'विल्ली' मारणारी मुलं (दुचाकीवर बसून तिचं पुढचं चाक हवेत उडवणं या प्रकाराला 'विली' असं म्हणतात) हे सगळे प्रकार अपघाताला निमंत्रण नाहीये का ? हेल्मेट घातल्याने टळणार आहेत हे प्रकार ?

बर्‍याच लोकांना हेल्मेट घेणं परवडत नाही. अशी कित्येक मुलं आहेत, कि जी सहा-सहा महिने आणि वर्षं-वर्षं अंगावर तेच कपडे घालून शाळा-कॉलेज मध्ये किंवा कामाला जातात.  कित्येक महिने त्यांना साधं १००-१५० रुपयांचा नवा शर्ट घेणं सुद्धा जमत नाही. दुचाकी जवळ असते कारण ती सोईची पडते. कामाचे ठिकाण किंवा शाळा-कॉलेज लांब असेल तर बस भाड्यापेक्षा दुचाकीचा प्रवास हा स्वस्त वाटतो, कारण प्रवासाचा खूप वेळ वाचतो, मनस्ताप वाचतो आणि रात्री-अपरात्री कधीही सुरक्षितपणे घरी पोहोचता येतं, म्हणून मुलं दुचाकीचा पर्याय निवडतात. आणि ती दुचाकी पाण्यावर चालू शकत नाही म्हणून मग नाईलाजास्तव पेट्रोल भरावं लागतं. त्यामुळे खिशात खाण्या-पिण्या इतके पैसे नसताना, एखादा नवा सदरा घेण्याचे पैसे नसताना सुद्धा केवळ गरज म्हणून पेट्रोल भरावं लागतं. अशा परिस्थितीत राहणार्‍या लोकांना ३५० ते १२०० पर्यंत अव्वाच्या-सव्वा किमती असलेलं तुमचं हेल्मेट कसं परवडणार ? बरं तुम्हाला साधंसुधं रस्त्याच्या कडेला विकत घेतलेलं हेल्मेट चालत नाही, चांगलं ISI मार्क वालंच पाहिजे. पैसे कोण देणार त्यासाठी ?

दुसरा एक मुद्दा : पुण्यात मोठ्या प्रमाणावर लघुउद्योजक आहेत. अशा लघु-उद्योजकांना दररोज  दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. कधी कधी स्वतःला तर कधी कधी कामाला ठेवलेल्या गडी माणसांना किमान दहा वेळा तरी दुचाकीवरूनच मालाची ने-आण करावी लागते. स्वतःचा, गाडीचा आणि जवळ असलेल्या  मालाचा तोल सांभाळावा लागतो. तेव्हा कामाच्या गडबडीत दर वेळी ते डोक्यावरचं जड हेल्मेट सांभाळायचं , स्वत:ला सांभाळायचं कि जवळचा माल सांभाळायचा ? याच तोल सावरा-सावरीत अपघात घडला म्हणजे दोष कुणाला द्यायचा ?  बरं दिवसातून दहावेळा फेर्‍या मारताना एखाद्या फेरीच्या वेळी घाई-घाईत विसरलं ते हेल्मेट कुठेतरी तर ? पुन्हा नवीन घ्यायचं का ? किंवा कदाचित ओळखीच्याच ठिकाणी ते विसरलं असेल तर पुढच्या वेळी जाऊ तेव्हा घेऊ असं ठरवलं, आणि मध्येच चौकातल्या पोलीसांनी अडवलं, तर त्यांना हे कारण सांगून पटेल का ? दंडाची पावती न करता सोडतील का ते ?


इथे मांडलेले मुद्दे सगळ्यांनाच पटतील असे नाहीयेत आणि सगळ्यांना ते पटावेत यासाठी ते लिहिलेलेपण नाहियेत.  हेल्मेट घातल्याने मान दुखते, खूप घाम येतो, मान वळवून इकडचं-तिकडचं पहाता येत नाही, अशी बालिश वा कमी महत्त्वाची कारणं मी इथे दिलेली नाहीयेत. कारण हेल्मेट घालूच नये, असं मला म्हणायचं नाहीये. ज्यांना ते सोईचं वाटतं, सोप्प वाटतं किंवा गरजेचं वाटतं त्यानी ते जरूर घालावं. हेल्मेट वापराविषयी जनजागृती सुद्धा करावी. पण त्याची सक्ती करू नये  आणि सक्ती केलीच तर हेल्मेट न वापरणार्‍या लोकांकडून दंड वसूल करू नये.

समाजातील सगळ्या घटकांचा, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा, रोजच्या राहणीमानाचा, मानसिक स्थितीचा आणि हेल्मेट नसताना होणार्‍या मनस्तापाचा संबंधितांनी नीट विचार करावा. देण्यासाठी जीव स्वस्त आणि घेण्यासाठी वस्तू महाग अशा मनस्थितीत असणार्‍या सामान्य माणसाला महागाई, भ्रष्टाचार, आर्थिक मंदी, कमी पगार, वाढता खर्च, रोज नव्याने आयुष्यात येणारे अपेक्षाभंग या सगळ्याचा आधीच मनस्ताप पुरेसा असताना. हा विकतचा ISI मार्क वाला मनस्ताप कशासाठी ?

हेल्मेटला नाही तर त्याच्या सक्तीला त्रासलेला एक पुणेकर तरूण !

तुम्हाला काय वाटतं मंडळी ?

1 comment: